किमान कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर बना: डॉ. महेंद्र घागरे
दिव्यराज न्युज जत :- राजे रामराव महाविद्यालय, जत मध्ये 'रोपवाटिका व्यवस्थापन ' सारखे इतर विविध किमान कौशल्य विकास शिकवणारे विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन हरित मित्र परिवार, पुणे चे संस्थापक डॉ. महेंद्र घागरे यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे आयोजित 'रोपवाटिका व बीज गोळे निर्मिती सप्ताह' उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे होते.
डॉ. घागरे पुढे म्हणाले की, जागतिक तापमान वाढ व मानवी लोकसंख्या वाढ यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा सर्वात जास्त फटका जैवविविधतेवर होत असून अनेक प्राणी व वनस्पती यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल साधण्यासाठी विविध जंगली झाडे व फळझाडांच्या बियांचे संकलन करून जास्तीत जास्त रोपे तयार करून तसेच बीजगोळे तयार करून रानोमाळ त्यांचा प्रसार करून वृक्षलागवडीला हातभार लावणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत इतर कौशल्ये आत्मसात करण्यासाठी विविध कौशल्य विकास शिकवणारे कोर्सेस करून आत्मनिर्भर बनावे. जत सारख्या दुष्काळी भागात पडीक माळरानावर जास्तीत जास्त फळबागा व इतर वृक्षांची लागवड करण्यासाठी रोपांची गरज असून भविष्यात रोपवाटिका व्यवसायात भरपूर फायदा मिळवण्याची संधी तरूणांनी घ्यावी असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले की, जत सारख्या दुष्काळी भागामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचे जतन होणे आवश्यक आहे. यासाठी लागणारी रोपे महाविद्यालयाच्या परिसरात तयार करून त्याचे वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांमार्फत बीज संकलन करून त्यापासून रोपे तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच बीज गोळे तयार करून जत तालुका परिसरात त्याचा प्रसार करुन वनसंपदा समृद्ध होण्यासाठी हातभार लागेल.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी डॉ. महेंद्र घागरे यांनी महाविद्यालयाच्या बागेतील विविध विभाग, बटरफ्लाय गार्डन, कॅक्टस व सक्युलंट गार्डन, आमराई, नारळ बाग, तुती, बांबू व औषधी वनस्पती लागवड यांची पाहणी करून मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले, सूत्रसंचालन कु. नेहा साळुंखे यांनी केले तर आभार प्रा. कु. प्रियांका भुसनुर यांनी मानले. यावेळी डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा. महादेव करेन्नावर, डॉ. भिमाशंकर डहाळके, डॉ. मल्लाप्पा सज्जन, डॉ. विजय जाधव, डॉ. ललिता सपताळ, श्री. बिराप्पा पुजारी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment