पर्यावरणपूरक अस्थिविसर्जनाचा नवा पायंडा.

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :-  दि. बनाळी, तालुका जत येथील माजी मुख्याध्यापक राजाराम निमाजी कोकरे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थि व रक्षाचे विसर्जन नदी, ओढे यासारख्या जलस्त्रोतात न करता स्वतःच्या शेतातच खड्डा करून त्यात विसर्जित केल्या व त्या ठिकाणी एका वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.
   एकूणच देशातील जलस्त्रोतांचे होणारे प्रदूषण आणि भविष्यात व्रृक्षांची असणारी गरज लक्षात घेऊन त्यांच्या पश्चात त्यांचे मुले डॉ. श्रीकांत कोकरे व डॉ. चंद्रकांत कोकरे यांनी त्यांच्या मातोश्री संपदा, बहिण गोकुळा व नातेवाईक यांचे मतपरिवर्तन करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील नद्या जितक्या औद्योगिक प्रगतीने प्रदूषित होत आहेत तितक्याच धार्मिक अंधश्रद्धांच्यामुळे होत आहेत. त्यामुळे नद्या, नाले, तलाव, ओढे यासारखे जलस्रोत प्रदूषित न होता ते पुढील पिढीकडे उत्तम आरोग्यासाठी प्रदुषणविरहीत हस्तांतर करणे ही आजच्या पिढीची खरी जबाबदारी आहे. त्यामुळे या पिढीने जुन्या परंपरांना आणि अंधश्रद्धांना पर्यायी, पर्यावरणपूरक, विज्ञानवादी, विवेकी वृत्तीने सामोरे गेले पाहिजे. याच उद्देशाने ग्रामीण भागातील डाॅ. श्रीकांत राजाराम कोकरे या सुशिक्षित कुटुंबाने घेतलेला हा विज्ञानवादी निर्णय नव्या पिढीला नक्कीच मार्गदर्शन करणारा ठरणार आहे. त्यांनी केलेल्या या पर्यावरणपूरक अस्थिविसर्जनाचा आदर्श तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील लोकांनी घेण्याची गरज आहे. 
     डॉ. श्रीकांत कोकरे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांचा विवेक स्वतःच्या कृतीतून समाजाला दाखवून दिला आहे. या वृक्षारोपण समारंभास श्री युवराज कांदेकर, जिल्हा परिषद शाळा पाचुंब्री, ता. शिराळा, उज्वल माने, वरिष्ठ मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा चिंचणी, ता. तासगाव, प्रकाश पाटील, जिल्हा परिषद शाळा कणेगाव, ता. वाळवा, गवस इनामदार, जिल्हा परिषद शाळा शिगाव, ता. वाळवा, जालिंदर यादव, वरिष्ठ मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा बुधगाव नं. 2,  माजी सैनिक भिमराव चौगुले, सत्यजित माने, बाबासाहेब ढेरे, वसंत खिलारे, दादासाहेब माने यांच्यासह कोकरेवस्तीयेथील नागरिक आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन