राजे रामराव महाविद्यालय, जत येथे 'जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न'
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- राजे रामराव महाविद्यालय, जत व समाज कल्याण विभाग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजे रामराव महाविद्यालय, जत येथे 'जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न' झाली. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रासाठी समाज कल्याण विभागाचे श्री.संग्रामसिंह छत्रे हे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी जात प्रमाणपत्रे पडताळणीसाठी लागणारे जातीविषयक व महसूल विषयक पुराव्यांची यादी, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, विहित मुदतीमध्ये सादर करावयाचा प्रस्ताव याविषयक येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रासाठी समाज कल्याण विभाग, सांगलीचे वरिष्ठ लिपिक श्री.तुकाराम थोरात हे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी असणारी ऑनलाइन प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली.
या कार्यशाळेसाठी विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जात पडताळणी प्रक्रियेविषयी त्यांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसन साधन व्यक्तींकडून करण्यात आले. त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आलेले परिपूर्ण प्रस्ताव तपासून स्वीकारण्यात आले.
जात पडताळणी प्रमाणपत्र विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर सकाळ सत्राचे प्रमुख प्रा.एस.एस.चव्हाण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ हे उपस्थित होते. ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
Comments
Post a Comment