राजे रामराव महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विचारमंच मुक्तपीठाचे उद्घाटन.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने "शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विचारमंच" आयोजित "मुक्तपीठ" या नवीन उपक्रमाचे उदघाटन श्री.स्वामी विकेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री.स्वामी विकेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत शार्दुलराजे डफळे, मा.चंद्रशेखर गोब्बी यांच्याप्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी सदर उपक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करताना व मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वाद, प्रतिवाद व संवादाची वृत्ती वृद्धींगत करण्याबरोबरच सहमतीच्या विवेकाबरोबरच असहमतीच्या धैर्याची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे. यामधून भारतीय लोकशाहीसाठी विवेकशील असे नागरिक निर्माण होतील.”
या उपक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, “राजे रामराव महाविद्यालयाकडून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. यामधून विद्यार्थ्यांमध्ये तर्कशीलता वृद्धींगत होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल. अशा उपक्रमामधून भावी कलाकार,वक्ते निर्माण होऊन महाविद्यालयाचा नावलौकिक देशभर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा.”
याप्रसंगी श्री.स्वामी विकेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी या उपक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल प्रा. अभयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर, आभार डॉ.परमेश्वर थोरबोले यांनी मानले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ.शिवाजी कुलाळ,डॉ.आप्पासाहेब भोसले, प्रा.सुखदेव नरळे, प्रा.कृष्णा रानगर, प्रा.हिरामण टोंगारे,डॉ.अशोक बोगुलवार, प्रा.तुकाराम सन्नके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment