आपत्कालीन सेवा ही सुद्धा समाजसेवा: विजय पवारराजे रामराव महाविद्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी:- दि. १५. जगातील अनेक विकसित देशात विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण तेथील प्रशासनाकडून मिळालेले असते. त्यामुळे अशा देशांमध्ये अतिशय शिस्तबद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने विद्यार्थी व नागरिक मदत कार्यात सहभागी होतात. याउलट अविकसित व विकसनशील देशांमध्ये हे होत नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती व संकटकाळी अनेक अडचणी व समस्या निर्माण होतात. अशावेळी युवकांनी आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण घेऊन समाजसेवा करावी. आपत्कालीन सेवा ही सुद्धा समाजसेवा असते, असे प्रतिपादन सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील उपस्थित होते.
या कार्यशाळेदरम्यान अग्निशामन विभागाने विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली. ज्याच्यामध्ये अग्निशमन वाहनाच्या साह्याने आग लागल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळवावे, याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. तसेच महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेना विभाग व अग्निशमन विभाग, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका यांच्यामध्ये अंतर्गत सामंजस्य करारही झाला. या कराराअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यापुढील काळातही विविध प्रकारचे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील विविध कौशल्य शिकवली जातील. ही प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment