बाबाजींच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल,जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू - सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजसांगली जिल्हा अंतर्गत मिरज तासगाव व पलुस येथेही सत्संग कार्यक्रम संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क -:- मे, 2023ः "सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू. आपण त्यांची शिकवण केवळ बोलण्या पुरती सीमित ठेवायची नसून आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे. शिकवणुकीच्या रूपात जे दिव्य मोती बाबजींनी दिले आहेत ते आपल्या जीवनात धारण करायचे आहेत. प्रेम, समर्पण आणि गुरूच्या प्रति जो आदर आहे तो अंतःकरणपूर्वक असावा, केवळ दिखावा नसावा . आपण स्वतःचे आत्मचिंतन करायचे आहे. प्रत्यक्षाल प्रमाणाची गरज नसते अशा प्रकारे आपला गुरुप्रति समर्पणाचा सच्चा भाव असावा. केवळ एका विशिष्ट दिवशी आपण त्यांचे स्मरण करायचे नसून त्यांनी दिलेल्या शिकवणुकीतून सदैव प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करावे." असे भावपूर्ण उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे आयोजित समर्पण दिवसाच्या मुख्य सोहळ्याला दिल्ली व आसपासच्या राज्यांमधून उपस्थित विशाल जन समुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. या कार्यक्रमात सद्गुरु माताजींच्या समवेत निरंकारी राजपिताही उपस्थित होते.
समर्पण दिवसा निमित्त सांगली जिल्ह्यातील सांगली खानापुर व वाळवा सेक्टर अंतर्गत मिरज तासगाव पलुस येथेही विशाल सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सांगली जिल्हा व परिसरातील भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण केली.
सद्गुरु माताजींनी एक उदाहरण देऊन समजावले, की दूध घुसळून त्यातून मलई किंवा नवनीत बाहेर पडू शकेल पण पाण्यात रवी घुसळून काहीही मिळणार नाही. तात्पर्य, ईश्र्वराशी नाते जोडल्यानेच खरी भक्ती होऊ शकेल आणि आपले मन आदर प्रेमाच्या भावनेने ओतप्रोत होईल व गुरूच्या प्रति खरीखुरी प्रेमाभक्ती हृदयात उत्पन्न होईल. म्हणूनच सद्गुरूंचा सत्य संदेश केवळ बोलण्या पर्यंत सीमित राहू नये.
सद्गुरु माताजी यांच्या प्रवचना पूर्वी निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या सम्बोधनात सांगितले, की बाबाजींचे अवघे आयुष्य उपकार, वरदान आणि कृपादृष्टीने परिपूर्ण होते. बाबाजींनी अवघ्या जगाला संसार प्रेम व शांतीचा दिव्य संदेश दिला. प्रेमाचा वास्तविक अर्थ आम्हाला बाबाजींच्या शिकवणुकीतूनच उमगला. त्यांनी सदैव प्रेम आणि आपल्या मधुर हास्याने सर्वांना आनंदित केले इतकेच नव्हे तर समस्त मानवमात्राच्या प्रति दया व करुणेचा भाव बाळगत सर्वांचे जीवन सार्थक केले. बाबाजींचा हाच दृष्टिकोन होता, की जीवनात जर प्रेमभाव असेल तर झुकणे सहज होईल. त्यांच्या मते आपण उंची अशा प्रकारे गाठावी, की तिचा मायावी दुष्प्रभाव भक्ताच्या जीवनावर होऊ नये. बाबाजींनी योग्यता अयोग्यता यांचा विचार न करता सर्वांभूती केवळ समानता आणि करुणेचा भावच दर्शविला. शेवटी राजपिताजी यांनी हीच प्रार्थना केली, की सर्वांचे जीवन सद्गुरूंच्या आशयानुसार व्यतीत व्हावे.
समर्पण दिवसाच्या मुख्य कार्यक्रमासह स्थानिक कार्यक्रमातही मिशनच्या अनेक वक्त्यांनी व्याख्यान, गीत, भजन व कविता आदि माध्यमातून बाबाजींच्या प्रेम, करूणा, दया व समर्पण यांसारख्या दिव्य गुणांचे वर्णन आपल्या शुभ भावनानांद्वारे केले. बाबा हरदेवसिंहजी यांची करूणामय अनुपम छबी प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात कोरली गेली असून त्यातून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भक्त आपले जीवन कृतार्थ करत आहे.
Comments
Post a Comment