सोन्याळ, लकडेवाडी तलावात पाणी सोडा अन्यथा श्री चे विसर्जन करणार नाही, तुकाराम बाबासह शेतकऱ्यांचा इशारा.

दिव्याराज न्युज नेटवर्क जत:- जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात म्हैसाळचे पाणी सोडण्यात आले असले तरी अद्याप जत पूर्व भागातील सोन्याळ, लकडेवाडी भागातील तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, जनावरांना प्यायला पाणी नाही की चारा नाही तेव्हा सोन्याळ, लकडेवाडी भागातील तलावात पाणी सोडावे अन्यथा  तलावात बसून बेमुदत आंदोलन करू तसेच गणेश विसर्जन करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
    यासंदर्भात म्हैसाळचे कार्यकारी अभियंता यांना हभप तुकाराम बाबा यांच्यासह या भागातील शेतकरी संगप्पा पुजारी, सिद्धण्णा पुजारी, विक्रम पुजारी, हणमंत पुजारी, पांडुरंग पुजारी, कलप्पा शिंगे, मल्लिकार्जुन केंगार, विजयकुमार बगली,  मदगौडा बिरादार, रामा लकडे, अरविंद बिरादार,  राजू सरगर, संगय्या सोमी, गुंडू माडग्याळ, रमेश पुजारी, मंजुनाथ बिरादार,  नंदेप्पा पुजारी, विठ्ठल बिरादार, विठ्ठल पुजारी, पिंटू मोरे, व्यंकटेश राजपूत, आशु मोहिते, पिराप्पा येडगे, चनप्पा नंदूर, ज्ञानेश्वर पाटील यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, जत तालुक्यात सद्यस्थितीत भीषण असा दुष्काळ पडला असून पिण्याच्या पाण्याची जनावरासाठी पाण्याची तीव्र टंचाई, चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच पशुधन ही संकटात आले आहे. सोन्याळ येथे पाणी टंचाई असल्याने दोन टँकर सुरू आहे. तरी सोन्याळ व लकडेवाडी हद्दीतील वगरे तलावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी त्वरित सोडावे. सोन्याळ व लकडेवाडी हद्दीतील वगरे तलावात पाणी सोडल्यास गावातील व शेजारच्या वाडीवस्तींचा पाणी प्रश्न काही अंशी सुटणार आहे तरी सध्या बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी या तलावात पाणी सोडणे शक्य आहे. त्याचबरोबर म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू आहे. या आवर्तनाद्वारे पाणी सोडावे अशी मागणी तुकाराम बाबा यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
■ तर श्री चे विसर्जन करणारच नाही
सोन्याळ,लकडेवाडी भागातील वगरे तलाव व अन्य तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे यासाठी आपण यापूर्वी नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी शेतकऱ्यांसमवेत रस्ता रोको आंदोलन केले त्यावेळी पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. सध्या म्हैसाळचे आवर्तन सुरू असूनही पाणी सोडण्यात आलेले नाही. हा या भागातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे. वगरे तलावासह तालुक्यातील ज्या तलावात अद्याप पाणी पोहचले नाही तेथे पाणी सोडावे अन्यथा मंगळवारी वगरे तलावात बसून आंदोलन तर करूच पण पाणी सोडले  नसल्याच्या निषेधार्थ जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत श्री चे विसर्जन करणार नसल्याचा इशारा आपण दिला होता. मंगळवारी तलावात बसून आंदोलन करण्याचे नियोजन आखले होते पण अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसात पाणी न सोडल्यास तलावात बेमुदत आंदोलन तसेच या भागातील शेतकरी श्री चे विसर्जन करणार नाहीत. लोकभावना ओळखा व पाणी सोडा अशी मागणी तुकाराम बाबा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.