दुष्काळासह जतच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबरला लक्षवेधी उपोषण, तुकाराम बाबा महाराज ; शासन, प्रशासनाच्या कामाविषयी केली नाराजी व्यक्त.
दिव्यराज न्युज नेटवर्क :- जत तालुक्यातील भयावह दुष्काळकडे शासन, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, रखडलेली म्हैसाळ योजना, रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी जत तहसिल कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिली. यासंदर्भात तहसिलदार जीवन बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तुकाराम बाबा म्हणाले, यंदा पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यातील परिस्थिती बिकट झाली आहे तालुक्यात भयावह दुष्काळ पडला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने ३० हुन अधिक टँकर सुरू आहेत. जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडलेला असताना मायबाप शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जत तालुक्यातील दुष्काळाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले त्याचबरोबर राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन दुष्काळाबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली पण प्रत्यक्षात या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.
जत तालुक्यातील सध्या म्हैसाळचे आवर्तन सुरू आहे. आवर्तन सुरू असल्याने दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला खरा पण प्रत्यक्षात पैसे भरून दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी घ्यावे लागत आहे. दुष्काळ टंचाई निधीतून तालुक्यातील तलावात पाणी सोडावे तसेच बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचवावे, जत तालुक्यातील माडग्याळ व अन्य भागात म्हैसाळचे जे काम सुरू आहे ते तातडीने मार्गी लावून या भागात पाणी सोडावे, विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. टेंडर निघाले असल्याचे सांगितले जाते पण अद्याप त्याचा पत्ता नाही. ही योजना तात्काळ मार्गी लावून जत पूर्व भागात पाणी सोडावे, जत तालुक्यात मागेल तेथे, टँकर, चारा डेपो, चारा छावणी सुरू करावी, दुष्काळी सवलती लागू न झाल्यास तात्काळ सवलती लागू कराव्यात, खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे . शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासही नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मंडळ निहाय दुष्काळ जाहीर केला आहे तसे न करता संपूर्ण जत दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा या आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले. यावेळी अमोल कुलाळ,रवींद्र खरात मानव मित्र संघटनेचे पिंटू मोरे उपस्थित होते
Comments
Post a Comment